छत्रपती संभाजी महाराजांचा परिवार..औरस आणि अनौरस.
संभाजी महाराजांना विवाहित पत्नी होत्या आणि नाटकशाळा सुद्धा होत्या आणि या नाटकशाळांपासून महाराजांना पुत्र ही होते आणि कन्या ही होत्या. याचे समकालीन उल्लेख आहेत. हा कोणताही कादंबरी कल्पना विलास नाही आणि या मुळे छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व कमी होत नाही.
संभाजी महाराजांना १ औरस मुलगा, ३ कन्या(औरस+अनौरस) , २ अनौरस मुलगे इत्यादी अपत्ये होती हे ससंदर्भ आपल्याला कळू शकते.
_____
मी या लेखात औरस मुलाच्या पुढे (औमु), अनौरस मुलाच्या पुढे (अनौमु), औरस कन्येच्या पुढे (औक) आणि अनौरस कन्येच्या पुढे (अनौक) असे लिहिणार आहे जेणेकरून समजायला सोपे जाईल.
_____
संभाजी महाराजांची पहिली पत्नी - येसूबाईसाहेब. विवाह इ.स. १६६१-१६६५ दरम्यान झाला असावा. येसूबाईंकडून संभाजीमहाराजांना भवानीबाईं (औक) आणि शिवाजीराजे(शाहू)(औमु) ही अपत्ये झाली.
संभाजी महाराजांची दुसरी पत्नी - दुर्गाबाईसाहेब. विवाह कधी झाला सापडत नाही. परंतु संभाजी महाराज ज्यावेळी सज्जनगडावर होते त्यावेळी त्यांच्याबरोबर या दुर्गाबाई होत्या. पुढे संभाजी महाराज जेव्हा मुघलांकडे गेले त्यावेळी सुद्धा दुर्गाबाई त्यांच्याबरोबर होत्या. नंतर महाराज स्वराज्यात आले, पण दुर्गाबाई आणि संभाजी महाराजांच्या एक भगिनी(राणूबाईसाहेब?) तिकडेच मुघलांकडे अडकल्या. पुढे त्यांचं काय झालं काहीच कळत नाही.
दुर्गाबाईंकडून संभाजीमहाराजांना १ मुलगी असावी असा आपण तर्क लावू शकतो.(विश्लेषण पुढे दिले आहे.)
१६८४ साली दुर्गाबाई व त्यांच्या बहिणीला सोडवण्यासाठी मराठ्यांकडून हल्ले होत असल्यामुळे औरंगजेबाने त्यांना दौलताबाद किल्ल्यावरून बहादूरगडावर हलवले होते असे दिसते कारण त्यावेळी संभाजीमहाराजांच्या २ बायका, १ मुलगी आणि ३ दास्या यांना ताब्यात घेतल्याची सहिशिक्क्याची पोचपावती बहादूरगडाचा किल्लेदार अब्दुल रहमान याने औरंगजेबाला पाठवली होती.
यामध्ये,
● २ बायकांपैकी एक नक्कीच दुर्गाबाई होत्या कारण पुढेही गिरजोजी यादवांकरवी त्यांना सोडविण्याचे प्रयत्न संभाजी महाराजांनी केले होते याचे उल्लेख सापडतात. दुसरी बाई म्हणजे संभाजी महाराजांची बहीण असावी.
● वरील १ मुलगी ही दुर्गाबाईंची मुलगी असावी. या मुलीचा विवाह औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडणाऱ्या शेख निजामाचा मुलगा अब्दुल कादर शी लावून दिला होता. जर ही मुलगी दुर्गाबाईंची नसेल तर दासीकन्या असेल.
● ३ दास्यांची नावे सापडत नाहीत.
______
● दासीपुत्र - संभाजी महाराजांना माधोसिंह आणि मदनसिंह या नावाचे दासीपुत्र होते जे सर्व राजपरिवाराबरोबर कैदेत होते आणि बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या काळात सुटले.
● दासीकन्या - औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या एका दासीपुत्रीचे लग्न शेवटचा आदिलशाह सिकंदर याचा मुलगा मुहम्मद मूहिउद्दीन याच्याशी लावून दिले होते.
थोडक्यात,
1. शाहू राजे (औमु) - छत्रपती. १७०७ मध्ये सुटका.
2. भवानी बाई (औक) - शंकराजी महाडिक या आत्येभावाशी लग्न.
3. कन्या क्रमांक २ (औरस/अनौरस माहीत नाही.) - लग्न शेख निजामाचा मुलगा अब्दुल कादर याच्याशी.
4. कन्या क्रमांक ३ (औरस/अनौरस माहीत नाही.) - लग्न शेवटचा आदिलशाह सिकंदर याचा मुलगा मुहम्मद मूहिउद्दीन.
5. माधोसिंह (अनौमु)- १६८९ साली राजपरिवाराबरोबर कैद. पुढे काय झाले कळत नाही. कदाचित कैदेतच मृत्यू.
6. मदनसिंह (अनौमु)- १६८९ साली राजपरिवाराबरोबर कैद. पुढे राजमाता येसूबाईंबरोबर सुटका. या मदनसिंगचा मुलगा पुढे पेशव्यांच्या दरबारी असल्याचे उल्लेख मिळतात.
संदर्भ :-
1. मआसिर ए आलमगिरी - साकी मुस्तैदखान (समकालीन)
2. मोगल दरबाराची बातमीपत्रे खंड तिसरा (समकालीन)
3. जेधे शकावली (समकालीन)
4. ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा - कै. डॉ. सदाशिव शिवदे.
5. मराठी रियासत
6. शिवपुत्र संभाजी - डॉ. कमल गोखले.
- ओंकार ताम्हनकर.

Comments
Post a Comment