ओळख नॉर्स पौराणिक कथेची

पौराणिक कथा म्हणजे माणसाने किंवा एखाद्या समाजाने परंपरेने स्वीकारलेली एखादी गोष्ट, अनुभव किंवा परिस्थिती होय. आज जगात अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यांच्यातील ग्रीकांच्या, ना᳴र्डिक लोकांच्या, इजिप्तच्या, रोमनांच्या, हिंदूंच्या पौराणिक कथा प्रसिद्ध आहेत. या लेखाचं प्रयोजन म्हणजे ना᳴र्डिक लोकांच्या पौराणिक कथेची ओळख. 

आठव्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत उत्तर युरोपियनांनी युरोप आणि आसपासच्या भागांवर अगणित छापे मारले, शहरे लुटली, जिंकली. कित्येक वेळा विजयी परतले तर कित्येक वेळा परतलेच नाहीत, तिथेच राहिले! पराभवांचा चटकाही अनेक वेळा त्यांना सहन करावा लागला. पण पराभवांमुळे खचून न जाता लढता लढता वीरमरण पत्करून आपल्याला Valhǫll (vallhala/वाल्हॉल्) मध्ये देवांबरोबर बसण्याची संधी मिळेल ही आशा कायम मनात बाळगणाऱ्या या उत्तर युरोपियन लोकांचा धर्म म्हणजे नॉर्दन धर्म आणि या धर्माचं मूळ म्हणजे Norse Mythology होय. आज प्रसिद्ध असलेले Vikings(Vikingr) हे उत्तर युरोपियनांमधील एक गट होय. या नॉर्स पौराणिक कथा मुख्यतः ज्या भागात प्रसिद्ध होत्या तो मूळ उत्तर युरोपियन भाग म्हणजे आजचा स्कँडेनेव्हिया.  स्कँडेनेव्हिया म्हणजे डेन्मार्कना᳴र्वे आणि स्वीडन. पुढें त्यांच्याच सांस्कृतिक वारसा सांगणारे देश (प्रदेश) म्हणजे फेरो आयलंड​आइस्लंड आणि ग्रीन्लंड​. 



  

नॉर्स पौराणिक कथांचे मूळ आणि स्रोत  

जुन्या पौराणिक कथा जाणून घेण्याआधी त्यांचे स्रोत जाणून घेणे तेवढेच​ महत्त्वाचे असते. त्यामुळे ना᳴र्डिकांच्या पुराणगोष्टीत शिरण्याआधी त्यांचे मूळ समजून घ्यायला हवे.  

 आईसलँड  

आईसलँड हा देश वायव्य​ युरोपात अटलांटिक महासागरात वसलेला एक द्विप-देश आहे. आज आपल्याला नॉर्स पौराणिक कथेविषयी जी काही माहिती मिळते ती सर्वप्रथम याच देशात लिहिली गेली.  

नवव्या शतकाच्या उत्तरार्धात नॉर्वे या देशावर हॅरोल्ड फेअरहेअर (harold Fairhair) नावाचा राजा राज्य करत होता. त्याने सर्वप्रथम केंद्रशासित सरकारी पद्धत (Centralized Government) अंमलात आणली. या सरकाराला विरोध म्हणून उत्तर नॉर्वेतील काही नागरिक नॉर्वे सोडून आईसलँड या बेटावर आले आणि राहू लागले. पुढे १०० वर्षात म्हणजेच इ.स. १००० रोजी त्यांनी ना᳴र्डिक धर्माचा त्याग करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला. आज आपल्याकडे नॉर्स पौराणिक कथांचे, ना᳴र्डिक धर्माचे जे काही स्रोत उपलब्ध आहेत ते, आईसलँडर्सनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर २०० वर्षांनी म्हणजे इसवी सन १२०० नंतर नमूद केलेले आहेत. 

  

 लिखित स्रोत  

नॉर्स पौराणिक कथांविषयी माहिती वेगवेगळ्या स्रोतांतून मिळते. त्यातल्या काही महत्वाच्या स्रोतांबद्दल माहिती. 

जुन्या कविता  

मध्ययुगीन आइस्लँडिक राजकारणी स्नोर्री स्टुर्लुसॊन्  (Snorri Sturluson) 

 सागाज् (Sagas) शौर्यगाथा 

ग्रम᳴टिकस् मध्ययुगीन डेनिश लेखक स᳴क्सो ग्रम᳴टिकस् (Saxo Grammaticus) 

 अहमद​ इब्न फद्लान​ 

 प्राचीन रोमन इतिहासकार ट᳴सिटस् (Tacitus) 

 

  •  जुन्या कविता  

जुन्या कवितांचे प्रामुख्याने २ भाग पडतात.  

१. पोएटिक् एड्डा (The Poetic Edda)  

पोएटिक् एड्डा हा नॉर्स पौराणिक कथा आणि धर्माविषयी जाणून घेण्यासाठीचा प्रार्थमिक आणि सगळ्यात अव्वल दर्जाचा स्रोत मानला जातो. हा अनेक कवितांचा संग्रह आहे. ह्या कविता बाराव्या शतकात लिहिल्या गेल्या, परंतु त्यांची भाषिक वैशिष्ट्ये बघता त्या बाराव्या शतकापेक्षा फार जुन्या आहेत हे दिसून येते. त्यामुळे यांचा संग्रह ना᳴र्स लोकांचे ख्रिस्तीकरण झाल्यानंतर करण्यात आला असला तरी या कवितांची रचना त्यांच्या मूळ ना᳴र्स धर्मीय पूर्वजांनी केली होते. यात विश्वाच्या निर्मितीपासून अंतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर कविता आहेत.  


२. स्काल्डिक् कविता (Skaldic Poems)  

स्काल्डिक् कविता हा अजून एक महत्वाचा स्रोत आहे. परंतु या कविता साधारणतः पौराणिक कथांविषयी नसून एखाद्या युद्धाच्या किंवा राजाच्या आठवणीत रचलेल्या असतात. त्यामुळे यात पौराणिकता पोएटिक् एड्डाच्या मनाने कमी आहे.  पोएटिक् एड्डा मधील कवितांची भाषा सोपी आहे. त्यामानाने स्काल्डिक् कवितांची भाषा जड आणि किचकट आहे.  


 

  •  लेखक स्नोर्री स्टुर्लुसॊन् (Snorri Sturluson - Icelandic Chieftain)  



१. The Prose Edda  

स्नोरी स्टुर्लुसॊन् हा बाराव्या-तेराव्या शतकातील आईसलँड मधील एक प्रमुख. त्याने 'द प्रोज एड्डाहा ग्रंथ​ १२२० च्या आसपास लिहिला. युरोपियन शैलीतील कवितांची आईसलँड मध्ये वाढत असलेली प्रसिद्धी बघून, कवितांच्या ना᳴र्डिक जुन्या शैली जिवंत रहाव्यात म्हणून त्याने 'द प्रोज एड्डा' हा ग्रंथ​ लिहिला. या पुस्तकाची मूळ प्रत आज उपलब्ध नाही. स्नोरीने ओल्ड​ आईसलँडिक भाषेत 'द प्रोज एड्डा' हेच नाव ठेवलेलं असेल हे ही आज आपण सांगू शकत नाही. Edda या शब्दाचा अर्थ पणजी असा होतो. स्नोरीच्या काळात आइस्लंडचे ख्रिस्तीकरण पूर्ण झाले होते. पण तरी सुद्धा जुन्या कथा-कहाण्या लोककथांच्या स्वरूपात जिवंत होत्याज्या आपल्याला काही अंशी एड्डामध्ये दिसतात​​. 


२. Ynglinga Saga (इङ्लिंगा सागा)  

नॉर्स पौराणिक कथांविषयी वाचताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आज उपलब्ध असलेले या कथांविषयी, धर्माविषयी मूळ लिखित स्रोत तो धर्म संपुष्टात आल्यानंतर २०० वर्षांनी लिहिलेले आहेत. इङ्लिंगा सागा हा ही स्नोरीने तेराव्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिलेला असून यात नॉर्वे मधील सम्राटांविषयी आणि त्यांच्या घराण्यांचा ना᳴र्डिक देवांशी संबंध सांगितलेला आहे.  

स्नोरी हा ख्रिश्चन होता. त्यामुळे त्याने प्रोज एड्डा आणि इङ्लिंगा सागा या दोघांमध्येही नॉर्स पौराणिक कथेंमधील देव हे देव नसून मनुष्यच होते ज्यांना देवत्त्व दिले गेले असे सांगितले आहे. परंतु हे सांगताना त्याने मूळ कवितांमध्ये मोठा बदल असा काही केलेला दिसत नाही किंवा ना᳴र्डिक धर्माला, देवांना, पात्रांना जाणूनबुजून कमी लेखलेले दिसत नाही. 

  

  • Saga (सागाज्)  

नॉर्स पौराणिक कथा किंवा त्यातील पात्रांविषयी थोडीअधिक माहिती समजून घेण्यासाठी सागाज् हे दुय्यम स्रोत आहेत. काही अपवाद वगळता सागा हे राजा किंवा एखाद्या थोर व्यक्तीबद्दल लिहिलेले असतात ज्यात ठिकठिकाणी ना᳴र्डिक देव आढळतात. बहुतेक सागाज् हे तेराव्या शतकात लिहिले गेले आहेत. 

  

  • सॅक्सो ग्रम᳴टिकस् (Saxo Grammaticus)  

सॅक्सो ग्रम᳴टिकस् हा एक लेखक होता. त्याने १२१५ मध्ये Gesta Danorum म्हणजे History of the Danes हे पुस्तक लिहिले. यात त्याने ना᳴र्डिक देवांचा उल्लेख केलेला आहे. परंतु त्याने त्यांना फारच कमी लेखलेलं आहे. तरी, यातूनही आपल्याला नॉर्स पौराणिक कथेतील पत्रांशी ओळख होते. 

  

वर म्हटल्याप्रमाणे नॉर्स या जुन्या धर्मविषयीची माहिती आपल्याला नवीन ख्रिस्ती धार्मिक लेखकांकडून मिळते. त्यामुळे काही ठिकाणी त्यांनी दिलेल्या माहितीवर ख्रिस्ती धर्माचा पगडा दिसून येतो. काही वेळा लेखकांकडून नवीन देव निर्माण झालेले दिसतात तर काही वेळा नवीन घटना. परंतु यातूनही ना᳴र्डिक धर्माविषयी, देवदेवतांविषयी ज्या गोष्टी आज आपल्याजवळ उपलब्ध आहेत त्या अतिशय आकर्षक आहेत. 

 


 

नॉर्स कथेनुसार विश्वाची निर्मिती 

विश्वाची निर्मिती हे एक सार्वत्रिक शाश्वत कोडं आहे. या घटनेवर जवळजवळ सगळ्याच पौराणिक कथा प्रकाश टाकतात. साधारणतः या गोष्टी त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थितीवर आधारित असतात.  

  •  मूस्पॆल् (MúspellMúspellsheimr 

नॉर्स पौराणिक कथेनुसार सर्वप्रथम या विश्वात काहीच नव्हते. नुसता अंधार आणि काळोख होता. या अशा अंधारात मूस्पॆल् (Múspellनामक पहिले लोक (विश्व) निर्माण झाले. या लोकात​ फक्त आग आणि प्रकाश या दोनच गोष्टी होत्या. त्यांचचे प्रमाण एवढे जास्त होते की त्या विश्वात कोणताही सामान्य जीव जगू शकला नसता.  


  • निव्ल्हॆइमर् (Niflheimr 

मूस्पॆल् सारखेच अजून एक निव्ल्हॆइमर् नामक एक लोक (विश्व)  निर्माण झालेमूस्पॆल् या लोकात प्रकाश होता तर निव्ल्हॆइमर् हे अंधकारमय लोक होते. या निव्ल्हॆइमर् मध्ये एक ह्वॆर्गॆल्मिर् (Hvergelmir) नावाचा पाण्याच स्रोत होता जो ११ विषारी नद्यांचा उगमस्थान होता. 


  • गिन्नुंगागाप् (Ginnungagap)  

गिन्नुंगागाप् ही मूस्पॆल् आणि निव्ल्हॆइमर् या दोन्ही लोकांमध्ये असणारी एक पोकळी.  


  •  इमिर (Ymir)  

वर बघितल्याप्रमाणे निव्ल्हॆइमर् मधून ११ नद्या उगम पावतात. त्या पुढे गिन्नुंगागाप् या पोकळीत प्रवेश करतात. ही एक पोकळी असल्यामुळे तिथे थंडावा असतो. त्या थंडाव्यामुळे नद्या गोठतात आणि पाण्याचा बर्फ होतो आणि गिन्नुंगागाप् ही सर्व पोकळी बर्फाने भरून जाते. गिन्नुंगागाप्च्या दुसऱ्या टोकाला असलेल्या मूस्पॆल् या विश्वातील आगीमुळे गिन्नुंगागाप्मधील त्या भागाचा बर्फ वितळण्यास सुरवात होते आणि त्या विताळण्याच्या प्रक्रियेदरम्यान जे पाण्याचे थेंब पडतात त्या थेंबांतून विश्वातील पहिल्या मनुष्याचा, इमिरचा जन्म झाला. 

इमिरचे दुसरे नाव और्गॆल्मिर् (Aurgelmir) असेही आहे. रात्रीच्या वेळी इमिरच्या काखेतून घाम गळाला आणि त्या घामातून योटुन्न् ची (jotunn) पहिली पिढी जन्माला आली. त्याचप्रमाणे इमिरच्या दोन्ही पायांनी एकमेकांशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यांच्या संबंधातूनसुद्धा काही योटुन्न् जन्माला आले.  

हे योटुन्न् म्हणजे देवांच्या गटाप्रमाणे दुसरे गट आहेत ज्यांचा प्रत्येकवेळी काहींनाकाही कारणांमुळे देवांशी संबंध आलेला आहे. अशाप्रकारे इमिर हा पहिला मनुष्य होता आणि योटुन्न्चा पहिला पूर्वजही होता.  


  • औदुम्ला (Auðumla)  

गिन्नुंगागाप् च्या बर्फामधून जसा इमिर जन्माला आला तशाच प्रकारे एक गाय सुद्धा जन्माला आली. तिला कथेत औदुम्ला म्हणतात. सुरवातीला इमिर या गायीच्या दुधावर अवलंबून होता. ही औदुम्ला ३ दिवस खारट बर्फ चाटत राहिली आणि ३ दिवसांनी त्या बर्फामधून एक माणूस जन्माला आला. हा माणूस म्हणजे बूरि (Búri). बुरी हा नॉर्स पौराणिक कथेतील मुख्य देवांच्या घराण्याचा, अ᳴सिर् (Æsir) देवांचा पहिला पूर्वज होय.  


अशाप्रकारे आतापर्यंत घडलेल्या घटना थोडक्यात सांगायच्या झाल्या तर, 

१. मूस्पॆल् या प्रकाश, आगीच्या विश्वाची निर्मिती 

२. निव्ल्हॆइमर् या काळोखी विश्वाची निर्मिती 

३. दोन्ही विश्वांच्या मधोमध गिन्नुंगागाप् ही पोकळी 

४. निव्ल्हॆइमर् या विश्वातील विषारी नद्यांचे पाणी गिन्नुंगागाप् मध्ये येऊन पाण्याचे बर्फात रूपांतर.  

५. मुस्पॆल् मधील आगीमुळे बर्फ वितळण्यास सुरवात. 

६. बर्फ़ातील पाण्याच्या थेंबांमुळे पहिला योटुन्न् इमिरचा आणि गाय औदुमलाचा जन्म.  

७. इमिर मधून योटुन्न् च्या पहिल्या पिढीचा जन्म.  

८. औदुम्लाच्या बर्फ चटण्यामुळे पौराणिक कथेतील मुख्य देवांच्या घराण्याच्या, अ᳴सिर् घराण्याच्या मुळपुरुषाचा, बूरि (Búri) चा जन्म.  


 

 

ओदिन् (Óðinn) चा जन्म आणि विश्वविस्तार 

वर उल्लेखलेल्या बुरीला एका योटुन्न् महिलेच्या संबंधांतून बोर (Borr) नावाचा मुलगा होतो. पुढे बोर​ आणि बेस्ट्ला (Bestla) नावाच्या एका योटुन्नला ३ मुलले होतात. ती तीन मुले म्हणजे ओदिन् (Óðinn), विलि (Vili) आणि वे (Vé). (हा ओदिन् म्हणजेच आजच्या मालिका/ सिनेमांमधील प्रसिद्ध ओडिन होय. ) 


ओदिन्


पुढे ओदिनने आपल्या भावांसोबत  इमिर् (Ymir)ला मारून त्याच्या शरीराचे तुकडे केले आणि, 

  • इमिरच्या मांसातून पृथ्वी निर्माण केली, 

  • त्याच्या रक्तातून समुद्र निर्माण केले, 

  • त्याच्या हाडांमधून पर्वतरांगा बसवल्या, 

  • त्याच्या केसांमधून झाडे बनवली, 

  • त्याच्या मेंदूपासून ढग बनवले,

  • त्याच्या कवटीमधून आकाश निर्माण केले.  

  • त्यांनी त्याची कवटी वर धरली आणि तिच्या चारही बाजूंना dwarf(ठेंगणे मनुष्य) ठेवले. अशा प्रकारे ओदिनने चारही दिशा निर्माण केल्या.   




  • द्वॆर्गर् (Dvergr)  

Dwarf (ठेंगण्या माणसांना) नॉर्स पौराणिक कथेत द्वेर्गर (Dvergr) म्हणतात. सुरवातीला ही ठेंगणी माणसे इमिरच्या मांसातील किडे होती आणि पुढे ओदिन् (Óðinn) मुळे माणसे बनली. हे Dwarfs अतिशय हुशार होते, तसेच तरबेज कारागीरही होते. त्यांनी देवांसाठी बरीच शस्त्रास्त्रे वगैरे बनवली. त्यांची सगळ्यात प्रसिद्ध कारागारी म्हणजे थोर्र् (Þórr/Thor) चे शस्त्र म्यॅाल्निर् (Mjǫllnir). 



  

नॉर्स पौराणिक कथांमधील ९ प्रांत. 

नॉर्स पौराणिक कथांमध्ये एकूण ९ प्रांत आहेत. कथांमधील वेगवेगळे गट या वेगवेगळ्या प्रांतात राहतात. हे नऊ प्रांत म्हणजे ९ ग्रह नाहीत. प्रांतांपैकी मूस्पॆल् आणि निव्ल्हॆइमर् हे दोन प्रांत आपण विश्वनिर्मितीच्या वेळी पाहिले आहेत. 

३. योटुन्हॆइमर् (Jotunnheimr) 

पुढे ओदिनने पृथ्वीचा जो भाग योटुन्न् यांना राहण्यासाठी दिला. त्याला योटुन्हॆइमर् (Jotunnheimr) म्हणतात. 


४. मिद्गार्दर् (Miðgarðr) 

पृथ्वीवरून फिरत असताना ओदिन् ला एक अ᳴शच्या झाडाचे लाकूड (Ash Tree/Askr) आणि एक द्राक्षाच्या वेलीचे लाकूड (Embla) दिसले. त्याने त्या लाकडांमध्ये नशीब आणि जीव घातला व अशाप्रकारे आस्क् आणि एंब्ला हे पहिले पुरुष - स्त्री निर्माण केले. त्यांना राहण्यासाठी आणि योटुन्न् पासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी इमिरच्या पापण्या गोळा करून त्या पृथ्वीच्या मध्यभागाभोवती तटबंदी म्हणून बांधल्या. अशाप्रकारे ओदिन्ने मनुष्यांना राहण्यासाठी मिद्गार्डर्ची निर्मिती केली.  


५. आ᳴स्गार्दर् (Ásgarðr) 

योटुन्न् आणि मनुष्यांना राहण्यासाठी जागा दिल्यावर ओदिनने अ᳴सिर् देवांना राहण्यासाठी विश्वाच्या मध्यभागी एक जागा बनवली. तिला आ᳴स्गार्दर् (Ásgarðr) म्हणतात. 

  • बीफ्रा᳴स्ट् (Bifrost) 

यानंतर ओदिनने मिद्गार्दर् (Miðgarðr) आणि आ᳴स्गार्दर् (Ásgarðr) या दोघांना जोडणारा एक इंद्रधनुष्यी पूल तयार केला. त्या पुलाला बीफ्रा᳴स्ट् (Bifrost) म्हणतात. 


६. वानाहॆइमर् (Vanaheimr) 

नॉर्स पौराणिक कथेत आ᳴स्गार्दर् या ठिकाणी अ᳴सिर् घराण्यातील देव राहतात आणि वानाहॆइमर् (Vanaheimr) येथे वानिर् (Vanir) घराण्यातील देव राहतात. या देवांबद्दल पुढे माहिती येईल.  


७. आणि ८. आ᳴ल्व्हॆइमर् (Álfheimr) आणि स्वार्टा᳴ल्व्हॆइमर् (Svartálfaheimr)  

या दोन प्रांतात अनुक्रमे Elves आणि Dark Elves हे राहतात. 


९. हॆल् (Hel) 

नॉर्स पौराणिक कथेमधील हॆल् (hel) हे अशा लोकांसाठी होते ज्यांचा मृत्यू लढताना झालेला नसतो. जे मनुष्य लढताना मरत नाहीत ते मेल्यानंतर हॆल् (Hel) या ठिकाणी जातात. हॆल् म्हणजे नंतरच्या काळातील hell सारखे नरकवत् स्थान नसून या लोकाप्रमाणेच एक लोक आहे. 

पौराणिक कथेनुसार हे नऊ प्रांत इग्द्रासिल् (Yggdrasill) नावाच्या एका अलौकिक वृक्षामुळे एकमेकांना जोडलेले असतात.  


 

चंद्र आणि सूर्य 

मिद्गार्दर् (Miðgarðr) वर मुंटॆल्फारि (Mundilfari) नावाचा मनुष्य राहत होता. त्याला मा᳴नि (Máni) आणि सोल् (Sol) ही दोन मुले होती. त्याने सोल् या आपल्या मुलीचे कोणा मनुष्याच्या मुलाशी लग्न लावून दिलले. ही गोष्ट देवांना पटली नाही म्हणून त्यांनी मानी आणि सोल दोघांना आ᳴स्गार्दर् मध्ये नेलं. मा᳴नि या मुलाला चंद्राच्या रथाला हाकायला ठेवलले आणि सोल् या मुलीला सूर्याच्या रथाला हाकायला सांगितलले. अशाप्रकारे नॉर्स पौराणिक कथेत चंद्र (किंवा चंद्राच्या रथाचा सारथी) पुरुष आणि सूर्य (किंवा सूर्याच्या रथाची सारथी) स्त्री आहे.

 

 

नॉर्स पौराणिक कथेतील काही महत्वाच्या देव-देवता 

  नॉर्स पौराणिक कथांमध्ये एकूण २ प्रकारचे किंवा २ घराण्यातील देव आहेत.  

१. अ᳴सिर् (Æsir) - वर बघितल्याप्रमाणे हे देव म्हणजे Oðinn चे वंशज.  

२. वानिर् (Vanir) 

वानिर् (Vanir) हे नॉर्स पौराणिक कथांमधील देवांचचे दुसररे घराणणे. ते साधारणतः पृथ्वी आणि समुद्राशी जोडलेले असत. त्यांचे पद अ᳴सिर् (Æsir) देवांपेक्षा खालचे होते असे म्हणायला हरकत नाही. या वानिरांचा महत्वाचा देव म्हणजे न्यॊर्दर् (Njǫrðr). हा एक समुद्र देव. त्याला फ्रा᳴यर् (Freyr) आणि फ्रा᳴या (Freyja) ही दोन मुलं. फ्रा᳴यर् हा शेतीचा देव तर फ्रा᳴या ही प्रेमाची,जादूटोणाची देवता होती.  

  

  •  अ᳴सिर् (Æsir) 


ओदिन् (Óðinn) 

ओदिन् हा नॉर्स पौराणिक कथांमधील सगळ्यात महत्वाचा देव आहे. तो देवांचा राजा आहे. तो Allfather आहे! याचबरोबर तो कवितांचा,युद्धांचा, युद्धात मारल्या गेलेल्या योध्यांचाही देव आहे. त्याने सर्वज्ञान प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या एका डोळ्याचे बलिदान दिले आणि इग्द्रासिल् (Yggdrasill) या अलौकिक वृक्षाला लटकून स्वतःलाच स्वतःचे बलिदान दिले.  

तो सर्वज्ञानी असल्याने त्याला स्वतःचे आणि इतरांचे भविष्य, नशीब माहीत आहे. त्याला भविष्यात घडणारा राग्नारा᳴क् (Ragnarok) हा प्रसंगही माहीत आहे ज्यात सर्व मनुष्य, देवांचा, विश्वाचा नाश होणार आहे. त्या अंतिम युद्धासाठी सैनिकांच्या भरतीसाठी तो मिद्गार्दर् (Miðgarðr) मध्ये फिरत असतो आणि जो कोणी युद्धात मारला जाईल त्यास आपल्याबरोबर वाल्हा᳴ल् (Valhǫll) मध्ये घेऊन जातो. ओदिन् (Óðinn) बरेचदा स्वतःच्या स्वार्थासाठी मिद्गार्दर् (Miðgarðr) वरील लोकांमध्ये युद्धे घडवून आणतो, त्यांना मारतो. त्यामुळे थोर्र् (Þórr/Thor) आणि लोकि (Loki) त्याला वाईट करणारा किंवा खुनी वगैरेही संबोधतात.  

कथांमधून बघायचं झालं तर ओदिन् (Óðinn)चा बऱ्याच स्त्रियांशी संबंध दिसून येतो. परंतु त्यांतून २ महत्वाच्या पत्नी म्हणजे फ्रिग्( Frigg) आणि यॉर्ड (Jörd/Fjörgyn). या दोघींपासून त्याला बाल्दर् (Baldr), Hoðr (हा᳴दर्), ब्रागी (Bragi), हरमोड (Hermod), थोर्र् (Þórr/Thor), मेअली (Meili) वगैरे मुले असतात.  

  •  ओदिन् (Óðinn) चे सभागृह  वाल्हा᳴ल् (Valhǫll) 

वाल्हा᳴ल् (Valhǫll) ही जागा ओदिन् ने अशा मनुष्यांसाठी बनवलेली असते जे मिद्गार्दर् (Miðgarðr) वरील युद्धात लढताना मृत्यू पावतात. ओदिन् त्याच्या स्त्रीयोध्यांना, वाल्किर्या (Valkyrja)ना सोबत घेऊन मिद्गार्दर् (Miðgarðr) वरील युद्धभूमींवरून युद्धात लढताना कामी आलेल्या सैनिकांना वलहॉल (Valhǫll) मध्ये अंतिम युद्धच्या, राग्नारा᳴क्च्या तयारी साठी घेऊन जात असतो. वाल्किर्या (Valkyrja) या शब्दाची फोड, व्हॉल (Val) म्हणजे युद्धभूमीवरील शवकिर्या (Kyrja) म्हणजे निवडणारी स्त्री. 

  

  

थोर्र् (Þórr/Thor) 


थोर्र् (Þórr/Thor) हा नॉर्स पौराणिक कथांमधील सगळ्यात प्रसिद्ध देव आहे. तो ओदिन् आणि या᳴र्द् (Jörð/Fjörgyn) यांचा मुलगा. त्याला मॆइलॆ (meili) नावाचा भाऊ आहे. त्याच्या  पत्नीचे नाव सिव् (Sif) होय. त्याला मोदि (Moði), माग्नि (Magni), थ्रूदर् (Þrúðr/Thrudr) ही मुलं होय.  थोर्र् (Þórr/Thor) हा मेघागर्जना, गडागडाटीचा, वादळाचा देव आहे. ओदिन् (Óðinn)ला बरेचदा विश्वासघातकी, खुनी, स्वतःला शिष्ट समजणाऱ्या संबंधीचा वगैरे म्हटले जाते, पण याउलट थोर्र् (Þórr/Thor) ला अतिशय दयाळू, सामान्य लोकांचा राजा, थोर वगैरे संबोधलेले दिसते. थोर्र् (Þórr/Thor)च्या शास्त्राचे नाव म्यॊल्निर् (Mjollnir) हे आहे आणि त्याने तो योटुन्न् चा संहार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. Mjöllnir च्या व्यतिरिक्त, त्याच्याकडे Megingjörð नावाचा एक पट्टा देखील आहे जो त्याची आधीच विलक्षण असलेली ताकद दुप्पट करतो. तो मनुष्य आणि एसीर देव या दोघांचा संरक्षक आहे. हल्ली दाखविल्याप्रमाणे त्याच्या केसांचा, दाढीचा रंग सोनेरी नसून लाल आहे. 

  

लोकि (Loki) 

लोकि (Loki) हे नॉर्स पौराणिक कथांमधील एक फारच महत्वाचं पात्र आहे. The Prose Edda मध्ये स्नोरी स्टर्लसन लोकि (Loki) ला Áss (आ᳴स्) म्हणजेच अ᳴सिर् (Æsir) देवांच्या घराण्याचा सदस्य संबोधतो. परंतु Prose आणि Poetic या दोन्ही एड्डांमध्ये त्याचं पात्र खलनायकाचं आहे. लोकि (Loki)चे वडील फा᳴र्बाउति (Fárbauti) हे एक योटुन्न्/जायंट होते आणि आई लाउवोय् (Laufey) की एक आ᳴सिन्या (Ásynja) म्हणजे अ᳴सिर् (Æsir) घराण्यातील एक देवी होती. साधारणतः अ᳴सिर् (Æsir) देवांमध्ये वडील अ᳴सिर् असतात आणि आई योटुन्न् असते. लोकि (Loki) च्या बाबतीत वडील योटुन्न् आहेत आणि आई अ᳴सिर् (Æsir) आहे. हा एक विशेष अपवाद आपल्याला इथे बघायला मिळतो. आई देवांकडची म्हणूनच कदाचित लोकि लोकि लाउवोयासॊन् (Loki Laufeyjarson) या नावाने ओळखला जातो, नाहीतर नेहमी वडिलांचे नाव शेवटी लागते.  

लोकिच्या बायकोचे नाव सिगिन् (Sigyn) हे आहे. त्याला बीलॆइस्टर् (Býleistr) आणि हॆल्बिंडि (Helblindi) हे २ भाऊ आहेत. आंग्र्बोदा (Angrboða) या दुसऱ्या एका योटुन्न् पासून त्याला ३ मुलं होतात. ती मुलं म्हणजे या᳴र्मुंगांदर् (Jormungandr), फेन्रिर् (Fenrir) आणि हेल् (Hel). लोकि स्वतः दिसायला अगदी देखणा पण कपटी वृत्तीचा आहे.  

The Poetic Edda मधील लोकासेन्ना (Lokasenna) या कवितेनुसार लोकि आणि ओदिन् हे दोघे मानलेले भाऊ आहेत. पौराणिक कथेमध्ये लोकि जरी खलनायक स्वरूपात असला तरी बरेचदा त्याने अ᳴सिर् देवांना मदतही केलेली दिसते. परंतु तो ओदिन् च्या मोठ्या मुलाचा धोक्याने खून करवतो. (या बाबतीत पुढे विश्लेषण येईल.) तो अ᳴गिर् (Ægir) नावाच्या देवांच्या नोकराला मारून टाकतो कारण देव त्या नोकरची प्रशंसा करत असतात आणि लोकिला नोकरांची प्रशंसा केलेली आवडत नाही. यावरून त्याच्या स्वभावाचे दर्शन होऊ शकते. 

पुढे लोकिला काही कारणांमुळे (कदाचित देवांना दूषण दिल्यामुळे किंवा ओदिन्च्या मोठ्या मुलाचा धोक्याने खून करविल्यामुळे) देवांकडून शिक्षा होते. शिक्षा म्हणून देव लोकिच्या २ मुलांना नारि (Nari) आणि नार्वि (Narfi) ला लांडग्यांमध्ये रूपांतरित करून आपापसात युद्ध करवतीत. दोघांपैकी धारातीर्थी पडलेल्या एका मुलाच्या आतड्याने लोकिला बांधून ठेवतात. पुढे त्याच्या तोंडासमोर एक विषारी साप ठेवतात ज्याचे विष सारखं त्याच्या तोंडावर पडत असतं.  पुढे भविष्य असं असतं की राग्नारा᳴क् या अंतिम युध्दावेळी लोकि त्या तुरुंगातून स्वतःला सोडवेल आणि देवांविरोधात उतरणाऱ्या सैन्याचे नेतृत्व करेल. 

  

बाल्दर् (Baldr) 

बाल्दर् (Baldr) हा ओदिन् आणि फ्रिग् चा सगळ्यात मोठा मुलगा. तो अतिशय देखणा आणि सर्वगुणसंपन्न होता. तो सगळ्यांचाच प्रिय होता. त्याची आई फ्रिग् (Frigg) हिने जगभर फिरून सर्वांकडून अशा शपथा घेतल्या की कोणीही त्याला इजा पोहोचवणार नाही. परंतु लोकिने कपट करून बाल्दर् (Baldr) ला त्याच्याच सख्या आंधळ्या भावाकडून, हा᳴दर् (Hǫðr) कडून मारून टाकले. त्याने फ्रिग्च्या दासीचे रूप घेऊन तिला विचारले की खरंच सर्वांनी बाल्दर ला इजा करणार नाही अशी शपथ घेतली आहे का? यावर स्वतःची दासी समजून फ्रिग्ने उत्तर दिले की वाल्हा᳴ल् च्या पश्चिमेला असलेल्या एका तरुण वृक्षाने  तिला शपथ दिली नाही. हे ऐकून लोकिने त्या वृक्षापासून एक भाला तयार केला आणि बाल्दर् बरोबर खेळत असलेल्या त्याच्या आंधळ्या भावाला हा᳴दर ला दिला. त्याने तो भाला नकळत बाल्दर् वर मारला आणि अशाप्रकारे बाल्दर्चा मृत्यू झाला. त्याला नान्ना (Nanna) नावाची एक पत्नी आणि फा᳴र्सेति (Forseti) नावाचा मुलगा होता. 

  

हॆइम्दाल्लर् (Heimdallr) 

हॆइम्दाल्लर् हा नॉर्स पौराणिक कथेतील एक महत्वाचे पात्र आहे. तो एक जुन्या काळचा देव आहे. या देवाबद्दल, त्याच्या उत्पत्ती बद्दल आज जास्त माहिती उपलब्ध नाही. The Poetic Edda आणि इतर काही स्रोतांनुसार हॆइम्दाल्लर् हा देवांचा रक्षक आहे. तो बीफ्रॉस्त या इंद्रधनुष्यी पुलाचे आणि आ᳴स्गार्दर्चे योटुन्न् कडून रक्षण करत असतो.  हॆइम्दाल्लर ला ओदिन् (Óðinn) चा मुलगाही म्हटलं जातं. आणि त्याला एकूण ९ माता आहेत. त्या सर्व नऊ जणी बहिणी आहेत. त्या योटुन्न्/जायंट्स आहेत. अठराव्या शतकातील जाणकारांनी हॆइम्दाल्लर्च्या ९ मातांचा संबंध समुद्राच्या नऊ लाटांशी जोडलेला दिसतो. (हा सिद्धांत अजून सिद्ध झालेला नाही.) 

हॆइम्दाल्लर् ला झोपेची गरज नसते. त्याची दृष्टी लांबवर पसरते. त्याची ऐकण्याची क्षमता सुद्धा उत्तम आहे. तो वानिर् घराण्यातील प्रमाणेच भविष्य पाहू शकतो. त्याच्याकडे ग्याल्लार्हॊर्न् (Gjallarhorn) नावाचचे एक शिंग/तुतारी आहे. तो ते दर रात्री राग्नारा᳴क्हा प्रसंग जवळ येत आहे हे दर्शविण्यासाठी वाजवतो. The Poetic Edda मधील एका कवितेत हॆइम्दाल्लर ला मनुष्यांचा पालक म्हणून संबोधलेलं आहे. लोकि हा हॆइम्दाल्लर् याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. स्नोरीत्याच्या Prose Edda मध्ये सांगतो की राग्नारा᳴क् या अंतिम युद्धात दोघे एकमेकांना मारून टाकतात. 

  

तीर् (Týr) 

तीर् या देवाबाबतीत फारच थोडी माहिती आज आपल्याला मिळू शकते. तीर् चा उल्लेख The Poetic Edda मधील २ कवितांमधून येतो. त्याचे वडील हिमिर् (Hymir) नावाचे एक योटुन्न् आहेत. त्यूर्ला फक्त एक हात आहे. त्याचा दुसरा हात लोकि चा मुलगा फेन्रिर् जो एक लांडगा असतो तो चावून तोडून टाकतो. राग्नारा᳴क या अंतिम युद्धात तीर् हा गार्रमर नावाच्या कुत्र्याकडून मारला जाईल. 

आज आपल्याकडे नॉर्स पौराणिक कथेतील सगळ्याच गोष्टी उपलब्ध नाहीत. ज्या जुन्या गोष्टी असतील त्या बऱ्याच काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या असाव्यात आणि अशाच गोष्टींबरोबर काही देव-देवता, त्यांचं कार्य, त्यांचा हुद्दा हे सगळंच नष्ट झालं असणार. असंच तीर् बाबतीत झालं असण्याचा बऱ्याच संशोधकांचं मत आहे. त्यांच्या मते नॉर्स पौराणिक कथांमध्ये ओदिन्च्या आधी तीर् हा मुख्य देव असावा आणि पुढे काळाच्या ओघात ओदिन्हा मुख्य देव बनला असावा. याचं कारण असं की ग्रीक पौराणिक कथेतील झ्यूस् (Zeus), रोमन पौराणिक कथेतील यूपितेर् (Jupiter) आणि वैदिक ​द्यौष् (Dyàus) या तिन्ही महत्वाच्या देवतांच्या नावात आणि नॉर्स पौराणिक कथेतील तीर्च्या नावात साम्य आहे. नावात साम्य आहे हे सिद्ध आहे तरी आज पुराव्यांअभावी आपण तीर्चा हा मोठा हुद्दा प्रमाणित करू शकत नाही. 

  



नॉर्स पौराणिक कथा बरीच मोठी आहे. हल्ली मार्व्हल आणि काही टीव्ही मालिकांमुळे या कथेने तसेच ओदिन्थोर्र्लोकि सारख्या काही पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं आहे. परंतु या पलिकडे कथा अजूनतरी अनोळखीच आहे. त्यामुळे मी इथे सोप्या भाषेत या कथेची फक्त एक छोटी ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. 



संदर्भ  

The Poetic Edda  - Caroline Larrington 
The Poetic Edda - Dr. Jackson Crawford 
The Prose Edda - Snorri Sturluson 
Myth and Religion of the North  E.O.G. Turville-Petre 
The Norse Myth : A guide to the Gods and Heroes - Caroline Larrington 
The Age of the Vikings -Anders Winroth 
Viking Age Iceland - Jesse Byock 
Norse Myth - Our sources - Dr Jackson Crawford. 
Norse Creation Myth - Dr. Jackson Crawford 
Norse Mythology Family Tree – UsefulCharts 
Norse Mythology - Utkarsh Patel, Arundhati Dasgupta. 
Norse Gods – Johan Egerkrans 
https://www.medievalists.net/2015/01/quick-guide-norse-gods/

© ओंकार ताम्हनकर


Comments

Popular Posts