देवानां पिय पियदस्सी
आचार्य चाणक्य यांचे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करणारा हिंदुस्तानाचा सम्राट म्हणजे अशोक. अशोकाचे चक्रवर्ती हे उपपद त्याच्या ठायी सार्थ झाले होते हे त्याच्या राज्यविस्तारावरून दिसून येते.
भारतीयांनीच नाही तर अनेक पाश्चात्त्य इतिहासकारांनी सुद्धा अशोकाचे चक्रवर्तीत्व स्वीकारलं आहे. व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो,
His dominions were far more extensive than British India of to day excluding Burma
म्हणजे, आज ब्रिटिश इंडिया हे नाव जेवढ्या प्रदेशाला येते (ब्रह्मदेश वगळून) त्याच्यापेक्षाही जास्त विस्तृत प्रदेश अशोकाच्या सत्तेखाली होता. रे. मॅकफेल याने इंग्लंडचा सुप्रसिद्ध राजा आल्फ्रेड दि ग्रेट याच्याशी अशोकाची तुलना केली आहे. न्यायदानतत्परता, विद्योत्साह, आणि भविकता या बाबतीत दोघांमध्ये बरेच साम्य दाखवले आहे. परंतु त्याबरोबरच मॅकफेल हे ही कबुल करतो की आल्फ्रेड दि ग्रेट चे राज्य अशोकाच्या मगधाच्या कितीतरी पटीने लहान होते. प्रो. ह्रिस डेव्हीड्सने त्याच्या Buddhist India या ग्रंथात ओलिव्हर क्रोमवेलशी अशोकाची तुलना केली आहे.
वरील प्रकारे सम्राट अशोकाची तुलना नेपोलियन, पीटर दि ग्रेट, अलेक्झांडर इत्यादी पाश्चात्य व्यक्तींशी होऊ शकते. परंतु सम्राट अशोक या सगळ्यांपेक्षाही श्रेष्ठ होता हे आपण म्हणू शकतो. ते कसं?
१. अशोक नेपोलियन सारखा धाडसी शूर महत्वाकांक्षी होता परंतु त्याने महत्वाकांक्षेच्या पायी आपला नाश करून घेतला नाही.
२.पीटर दि ग्रेट प्रमाणे प्रजेच्या ऐहिक सुखाकडेच फक्त अशोकाची दृष्टी नव्हती. ऐहिक सुखाबरोबरच अध्यात्मिक आणि नैतिक उन्नती कशी साधावी हे त्याने दाखविले.
३. अलेक्झांडरने दिग्विजय केला. अशोकानेही कलिंगविजय केला. पण सगळा भारतीय उपखंड आपल्या स्वामित्वाखाली आल्यानंतर आता जिंकण्यास काही उरले नाही म्हणून तो अलेक्झांडर प्रमाणे शोक करत बसला नाही. उलट दिग्विजयाहूनही श्रेष्ठ असा आत्मविजय त्याने करून दाखविला.
याच प्रमाणे सेंट पॉल, अरबस्तानचा पहिला खलिफा उमर, मुघल बादशाह अकबर या सगळ्यांच्या तुलनेत सम्राट अशोकच श्रेष्ठ ठरतो.
अशोकाची कीर्ती लक्षात घेताना त्याच्या अफाट राज्यविस्तारात, अतुलनीय ऐश्वर्यात, अपरंपार संपत्तीत, कलिंग विजयात दिसून येतेच, परंतु याचबरोबर त्याच्या अंतःकरणाच्या औदार्यात, हृदयाच्या गहनतेत, त्याच्या अतुलनीय त्यागबुद्धितही दिसून येते.
अनुक्रमणिका
1】अशोकाचा कुलवृत्तांत
2】सम्राट अशोकाचे राज्यरोहण आणि राज्याभिषेक
3】अशोकाचा कलिंगविजय आणि युद्धानंतरची परिस्थिती
4】बौद्ध धर्मस्वीकार, धर्मयात्रा आणि धर्मप्रसार
5】अशोकाचा परिवार
6】अशोकाचे लेख
7】अशोक - एक विचार
***************
1】अशोकाचा कुलवृत्तांत
- मगध! सोळा महाजनपदातील एक महत्वाचे राज्य. सध्याचा भारतातील बिहारचा परिसर म्हणजे पूर्वीचे मगध साम्राज्य. आतापर्यंत ऐतिहासिक साधनातून मगधाच्या वेगवेगळ्या काळातील एकूण ४ राजधान्या दिसतात.
१. महाभारतातील जरासंधाच्या वेळची राजधानी गिरीव्रज(आत्ताचे गिर्यांक),
२. सातव्या शतकातील शिशुनाग वंशावेळची राजधानी राजगृह(आत्ताची राजगिर),
३. राजगृह (दुसरी)
४. सम्राट अजातशत्रूने पाटलीग्राम या गावी गंगा व शोणभद्र यांच्या संगमावर बसवलेली पाटलीपुत्र(आत्ताचे पटना) ही राजधानी.
- अशोकाचे पूर्वज.
जसा आज बऱ्याच घराण्यांचा कुलवृत्तांत उपलब्ध आहे तसा सम्राट अशोकाचा उपलब्ध नाही. तरी मिळालेल्या पुराव्यानुसार आपण अशोकाच्या पूर्वजांची उपयुक्त माहिती काढू शकतो.
१. शैशुनाग घराणे
यातील शिशुनागाला अशोकाच्या वंशाचा संस्थापक म्हणता येईल. याची कारकीर्द इ.स. पूर्व ७व्या शतकात झाली. याने साधारण ४० वर्ष मगधावर राज्य केलं. या वेळी मगधाची राजधानी वर उल्लेख केल्याप्रमाणे राजगृह ही होती.
२. बिंबिसार
बिंबिसार हा शिशुनागचा पाचवा वंशज. याचा काळ इ.स. पूर्व ५८१ ते इ.स. पूर्व ५५३ असा होता. हा फार पराक्रमी होता. याने मगधाच्या शेजारीच पूर्व हद्दीला लागून असलेला अंगदेश जिंकून घेतला. (अंगदेश म्हणजे महाभारतात दुर्योधनाने कर्णाला ज्या भागाचा राजा घोषित केलं होता तो प्रदेश. आत्ताचा मोघील, भागलपूर वगैरे परिसर.) या बिंबिसारने कोसल आणि लिच्छवींच्या राजघराण्यांशी संबंध जोडले आणि आपले बळ वाढविले.
बिंबिसारने पूर्वीची राजधानी राजगृह ज्या डोंगरावर होती ती सोडून डोंगराखालीच एक नवीन शहर वसवून तिकडे राजधानी हलवली. तिला राजगृहच नाव ठेवले. हा बिंबिसार जैन धर्माचे संस्थापक महावीर यांच्या काळात होऊन गेला.
३. अजातशत्रू
या अजातशत्रूने मगधची राजधानी राजगृह वरून हलवून पाटलीपुत्र/कुसूमपूर (आत्ताचे पटना) नामक नगर वसवून तेथे नेली.
४. महानंदन
अजातशत्रूनंतर साधारण १००-१२५ वर्षांनी महानंदन राजा बनला. हा शिशुनाग घराण्यातील शेवटचा राजा. याला महापद्मनंद नावाचा दासीपुत्र पुत्र होता. या महापद्मनंदने महानंदनची हत्या केली आणि नंद घराण्याची स्थापना केली.
५. महापद्मनंद
हा महापद्मनंद फार शूर, पराक्रमी पण तितकाच लोभी आणि निर्दयी होता. याच्याच काळात अलेक्झांडर हिंदुस्थानच्या हद्दीवर आला होता. हा महापद्मनंद अलेक्झांडरला हरवण्यासाठी ४०००० हत्ती, २०००० घोडदळ, २ लक्ष पायदळ घेऊन निघालाही होता परंतु अलेक्झांडर पंजाब प्रांतापर्यंतच थांबला व परत गेला आणि युद्ध टळले.
८ नंद राजे
महापद्मनंद ला ९ मुलं होती. त्यांच्यानंतर २४ वर्षाच्या काळातच ही ९ मुलं एकामागोमाग एक सम्राट बनून गेली.
६. धननंद
धनांनंद हा नंद घराण्यातील शेवटचा राजा. हा सुद्धा क्रूर, जुलमी निघाला. याला मुरा नावाची दासी होती आणि त्या दासीच्या मुलाचं नाव चंद्रगुप्त.
७. चंद्रगुप्त मौर्य
चंद्रगुप्ताने विष्णुगुप्त चाणक्याच्या मदतीने नंद वंशाचा उच्छेद करून इ.स. पूर्व ३२४ साली मगधाचे राज्य मिळविले. विष्णुपुरणानुसार तो मुरा दासीचा मुलगा, म्हणून मौर्य असे नाव त्याने लावले.
चंद्रगुप्तने नंदांपासून मिळविलेल्या मगध साम्राज्यात वेळोवेळी भर टाकली. चंद्रगुप्ताने वेळोवेळी मोहिमा करून पश्चिमेला हिंदुकुश ते पूर्वेस सुंदरबन आणि उत्तरेस हिमालय ते दक्षिणेकडे नर्मदा, विंध्य पर्वतापर्यंत साम्राज्य विस्तार केला. चंद्रगुप्ताने २४ वर्ष राज्य केले.
Chandragupta became the first strictly historical emperor of India and ruled the land from sea to sea.
-(Asoka The Buddhist Emperor Of India - Vincent Arthur Smith.)
म्हणजेच, चंद्रगुप्त अखंड भारताचा पहिला सम्राट बनला ज्याने पश्चिम समुद्रापासून पूर्व समुद्रापर्यंत पसरलेल्या भागावर राज्य केले.
८. बिंदूसार मौर्य.
चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा बिंदूसार सम्राट बनला. बिंदूसार या नावाचा उल्लेख कुठल्याही ग्रीक साधनात मिळत नाही, तिकडे नाव अमित्रघात असे येते. परंतु भारतीय साधनांमध्ये बिंदूसार हे नाव आढळते. अमित्रघात याचा अर्थ शत्रूंचा घात करणारा असा आहे त्यामुळे ही बिंदुसाराला मिळालेली पदवी असू शकते. चंद्रगुप्तप्रमाणेच बिंदूसारही अतिशय पराक्रमी सम्राट होता. चंद्रगुप्तांने त्याच्या काळात बनविलेल्या शत्रूंशी बिंदुसाराने यशस्वीरीत्या सामना केला.
बिंदूसाराच्या कारकिर्दीचा जास्त इतिहास उपलब्ध नाही. परंतु आपण तर्क लावू शकतो. चंद्रगुप्ताच्या काळात सगळाच दक्षिण भारत मगध साम्राज्यात नव्हता आणि पुढे अशोकानेही फक्त कलिंग जिंकून घेतले त्यामुळे दक्षिण भारत बिंदूसार याने जिंकला असावा असे दिसते. बिंदूसारने २५(काही साधनात २८) वर्ष राज्य केले आणि त्याचा इ.स. पूर्व २७३ मध्ये मृत्यू झाला आणि पुढे इ.स. पूर्व २६९ मध्ये अशोक सम्राट बनला.
***************
2】सम्राट अशोकाचे राज्यरोहण आणि राज्याभिषेक
अशोकाच्या पूर्वायुष्यासंबंधीची माहिती बौद्ध ग्रंथांतून तसंच दिपवंश व महावंश वगैरे सिंहली दंतकथांतून मिळते.
- अशोकाची आई
अशोकाच्या आईबद्दलची माहिती फक्त दंतकथांतून मिळते व आज बहुतेक सर्व संशोधकांकडून तिला अविश्वसनीय असा करार मिळाला आहे. तरी आपण अशोकाच्या आईची धावती भेट घेऊ.
असं म्हणतात की चंपा नगरीतील एका ब्राह्मणाच्या घरी अशोकाची आई सुभद्रांगीचा जन्म झाला. ती दिसायला अतिशय सुंदर होती त्यामुळे त्या ब्राह्मणाने तिला पुढे बिंदूसाराच्या राजवाड्यात पाठविले. तिकडे तिला तिच्या सौंदर्यामुळे महाराणींकडून हीन वागणूक मिळाली आणि न्हाविणीचे काम तिला देण्यात आले. काही दिवसांनी शेवटी बिंदूसाराची दृष्टी तिच्यावर गेली आणि त्याने तिच्याशी लग्न करून तिला आपली फक्त १६वी राणीच नाही तर पट्टराणी म्हणजेच महादेवी केले. पुढे सुभद्रांगीला अशोक आणि विगताअशोक अशी २ मुले झाली.
- अशोकाचे शिक्षण
याबद्दलही फक्त दंतकथाच आल्या आहेत. त्या अशा की, अशोक जन्माला आल्यापासून एकदम कुरूप व दुष्ट निघाला त्यामुळे पहिल्यापासूनच तो बिंदूसाराचा नावडता झाला. यामुळे त्याला इतर राजकुमारांबरोबर बोलू, खेळू देण्यात येत नसे आणि त्याचे शिक्षणही नीट झाले नाही. परंतु या गोष्टी त्याच्यावर सोपविलेल्या कामगिऱ्यांकडे बघून खऱ्या वाटत नाहीत.
- तक्षशिला व उज्जैनी
अशोकाची सर्वात पहिली ज्ञात कामगिरी म्हणजे त्याने तक्षशिला येथील मोडून काढलेले बंड. मौर्य घराण्याविरुद्धचे बंड हे अगदी चंद्रगुप्तांपासून चालून येत असतं. पुढे बिंदूसाराच्या काळातही अनेक बंड झाले. त्यातलेच एक तक्षशिला येथील बंड.
तक्षशिला हे सिंधू नदीपासून ३ दिवसांच्या मजलेवर सुप्रसिद्ध स्थान होते. बौद्ध ग्रंथात तक्षशिलाचा उल्लेख 'तक्षशिर' असाही येतो.
बिंदूसाराच्या काळात इकडे बंड झाले त्यामुळे राजाने राजकुमार अशोकाला बंड मोडण्यासाठी पाठवले. अशोकाने युद्ध व रक्तपात न करताच बंड मोडून काढले. यानंतर ३ वर्षे प्रांतापाल अशोक तक्षशिला मधेच राहिला.
पुढे त्याची नेमणूक उज्जैनी येथे झाली. काही कथांमधून अशी माहिती मिळते की अशोकाच्या सावत्र आईच्या सांगण्यावरून अशोकाची नेमणूक पाटलीपुत्रापासून लांब उज्जैनी मध्ये करण्यात आली. अशोक उजैनी मध्ये असतानाच पुढे इ.स. पूर्व २७३ रोजी बिंदूसाराचा मृत्यू झाला.
- सिंहासनासाठी संघर्ष व राज्याभिषेक
बिंदूसाराचा मृत्यू इ.स. पूर्व २७३ मध्ये झाला आणि अशोकाचा राज्याभिषेक इ.स. पूर्व २६९ म्हणजे ४ वर्षांनी झाला. यावरून आपण असा तर्क लावू शकतो की ही ४ वर्ष सिंहसनासाठी संघर्ष चालू होता.
तो संघर्ष कसा आणि किती जणांत झाला हे आपण आज ठामपणे सांगू शकत नाही. तरी काही साधनांमधील उल्लेख -
अ) महावंसो हा बौद्ध ग्रंथ सांगतो की संघर्ष अशोक व त्याच्या ९९ भावांत झाला.
आ)दिपवंसो हा बौद्ध ग्रंथ सांगतो की संघर्ष अशोक व त्याच्या १०० भावांत झाला.
इ)इतर सिंहली दंतकथांमध्ये सुद्धा साधारण असाच उल्लेख आहे की बिंदूसाराला १०१ पुत्र होते. पण त्यात १०१ पैकी फक्त तिष्य,अशोकवर्धन,सुमल या ३ पुत्रांचीच नावं मिळतात.
ई) तारानाथ म्हणतो की अशोकाने ६ भाऊ मारले.
उ) महाबोधिवंश या ग्रंथात म्हटले आहे की अशोकाचा संघर्ष त्याच्या ९८ भावांशी झाला होता.
स्पष्टीकरण -
१) हे संघर्ष होऊन त्याने एक सोडून सर्व भावांना मारून मारून टाकले असे ग्रंथांमधून दिसते. परंतु या वरील गोष्टींना ठोस काहीच पुरावा मिळत नाही आणि सम्राट बनल्यावर अशोकाने खोदविलेल्या एका आदेशात सरळसरळ म्हटलं आहे की 'आपले भाऊ पाटलीपुत्र नगरात व अन्यत्रही आहेत.' त्यामुळे वरील ग्रंथकथांमधील गोष्टी खऱ्या नसून अतिशयोक्ती असाव्यात असे दिसते.
२)तारानाथ विषयी सांगायचं झालं तर तो १६व्या शतकातील एक तिबेटी भिक्खू. तो स्वतः अशोकाचा मूळ लेखक नाही. त्याने अशोकाबाबतीत लिहिताना ३ प्राचीन साधनांचा आधार घेतलेला दिसतो. त्यातील २ संदर्भ म्हणजे श्रवण पिटक आणि ११व्या शतकातील क्षेमेन्द्रचे अवदानकल्पलता. तिसऱ्या संदर्भाचं नाव तारानाथ देत नाही. थोडक्यात तारानाथचे मूळ संदर्भ बरेच उत्तरकालीन आहेत.
These fictions were sufficiently refuted by the testimony of the inscriptions which proves that the brothers and sisters of the king were still living in the middle of the reign.
(पान १९ - Asoka The Buddhist Emperor Of India - Vincent Arthur Smith.)
या सगळ्यावरून आपण असा तर्क लावू शकतो की अशोकाने फक्त अशाच भावांना मारले ज्यांचे अशोकाबरोबर वैर होते आणि याच संघर्षामुळे यामुळे बिंदूसाराच्या मृत्यूनंतर अशोकाला गादीवर बसायला ४ वर्ष लागली.
***************
3】अशोकाचा कलिंगविजय आणि युद्धानंतरची परिस्थिती.
इ.स. पूर्व २६९ साली बिंदूसाराच्या मृत्यूनंतर ४ वर्षांनी अशोकाचा विधिवत राज्याभिषेक झाला. दिपवंसोत त्याला जांबुद्वीपाचा थोर राजा 'धम्म अशोक' म्हटले आहे. बौद्धग्रंथात त्याला 'चंड अशोक' असे नाव मिळते. परंतु चंड अशोक हे नाव बौद्ध सोडून इतर कोणत्याही साधनात मिळत नाही म्हणून ते बौद्ध ग्रंथात नंतर घातले गेले असावे.
अशोकाच्या शासनकाळातील सुरवातीच्या वर्षात काय झाले याबाबत कोणताही ठोस पुरावा मिळत नाही.
देवानां प्रियस्य अशोकस्य.
कलिंग युद्धापूर्वी ८ वर्षाच्या शासनकाळात विशेष अशी काही घटना घडलेली दिसत नाही.(८ वर्ष ही २६९ साली राज्याभिषेक झाल्यापासून. बिंदूसाराच्या मृत्यूपासून बघायची झाली तर १२ वर्ष.) फक्त या काळात कधीतरी अशोकाने स्वतःस 'देवानां पिय पियदस्सी राजा' ही बिरुदावली लावून घेतली. याचा अर्थ देवांना प्रिय असलेला प्रियदर्शी राजा असा होतो. अशोकच्या नंतर काहीच काळात झालेल्या पतंजलीने या पदाचा अर्थ चिरंजीव, आयुष्यमान, श्रीमान असा सांगितला आहे.
कलिंग देश.
अशोक सम्राट बनल्यापासून त्याने केलेल्या साम्राज्यविस्ताराचा जो पहिला आणि शेवटचा उल्लेख मिळतो तो म्हणजे कलिंग युद्ध. (त्याने इतर काही भाग जोडलेले उल्लेख आहेत पण त्या दंतकथा आहेत.)
कलिंग राज्य हिंदुस्तानाच्या पूर्व भागात ओरिसाच्या जवळ होते. पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेस पूर्वघाट, दक्षिणेस गोदावरी नदी आणि उत्तरेस महानदी अशा त्याच्या सीमा होत्या.
कलिंगच दुसरं नाव 'स्त्रि-कलिंग' असेही होते. राज्याची राजधानी 'राजपूर'(बौद्ध ग्रंथानुसार सिंहपूर) होती. लोकांची धर्मनिष्ठा, शौर्य, शिल्प, वाणिज्य यांसाठी हा देश प्रसिद्ध होता.
कलिंग युद्ध व भयंकर प्राणहानी.
चंद्रगुप्ताला, बिंदूसाराला जो जमले नाही असा कलिंग वर विजय अशोकाने मिळवून दाखवला. ही गोष्ट अशोकाच्या राज्यरोहणापासून ८ वर्षांनी म्हणजे इ. स. पूर्व २६१ मध्ये घडली.
अशोकाने लिहून घेतलेल्या एका गिरिलेखात युद्धाचा असा उल्लेख आहे की, "देवांचा प्रिय राजा याने राज्याभिषेकाला ८ वर्षे होऊन गेल्यावर कलिंग देश जिंकला. तेव्हा दीड लाख लोक कैद करण्यात आले, एक लक्ष लोकांना मारण्यात आले आणि या संख्येच्या अनेक पट लोक प्राणास मुकले."
यात 'लोकांना मारण्यात आले' म्हणजे युद्धादरम्यान मारण्यात आलेले सैनिक,लोकं.
'अनेक पट लोक प्राणास मुकले' म्हणजे कदाचित युद्धा नंतरच्या परिणामांना बळी पडलेले लोक. परिणाम म्हणजे दुष्काळ, महामारी, साथीचे रोग आणि नरसंहार
His(ashoka's) arms were successful and the kingdom(kalinga) was annexed to the empire.
(Asoka The Buddhist Emperor Of India - Vincent Arthur Smith.)
म्हणजे, अशोक विजयी झाला आणि कलिंग देश मौर्य साम्राज्याला जोडला गेला.
युद्धाचे परिणाम.
कलिंग युद्धातून उद्भवलेल्या प्राणहानीमुळे अशोकाच्या मनावर विलक्षण परिमाण घडला व त्यामुळे त्याच्या चरित्राबरोबरच हिंदुस्तानाच्या इतिहासात परिवर्तन घडून आले.
The horrors which must accompany war, even successful war, made a deep impression on the heart of the victorious monarch.
(Asoka The Buddhist Emperor Of India - Vincent Arthur Smith.)
थोडक्यात, युध्दासोबतच झालेल्या प्रचंड हानिमुळे युद्ध जिंकूनही विजयी सम्राट अशोकाचे मन द्रवले.
कलिंग युद्धाचे ३ परिणाम झाले.
- पहिला परिणाम - पुढील आयुष्यात अशोकाने युद्धाचे नाव काढले नाही.
- दुसरा परिणाम - प्रजेला भोगावे लागणारे अत्याचार, जुलूम बंद व्हावेत यासाठी अशोकाने सक्तीचे हुकूम सोडले.
- तिसरा परिणाम - अशोकाचा बौद्ध धर्म स्वीकार.
दुसऱ्या परिणामाविषयी थोडी अजून माहिती
आज कलिंग प्रदेशात जौगाड व धौली या ठिकाणी अशोकाचे २ शिलालेख सापडले आहेत. कलिंग राज्य खालसा केल्यावर आपल्या हातून धोर अन्याय घडला अशी टोचणी अशोकाच्या मनात लागून राहिल्यामुळे यापुढेतरी आपल्या अंमलाखाली कलिंग प्रजेला सुख लाभावे व अधिकारी वर्गाकडून त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत म्हणून त्याने कलिंग प्रांतासाठी जास्त सवलतीची अशी शासन पद्धती योजून तिच्या संबंधाचे हुकूमवजा दोन गिरिलेख जौगाड व धौली या ठिकाणी जाहीर केले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी त्याच प्रदेशातील पुरी तालुक्यातील तोसली या ठिकाणी त्याने राजप्रतिनिधी नेमला होता.
जौगाड येथील शिलालेख.
धौली येथील शिलालेख.
4】बौद्ध धर्म स्वीकार, धर्मयात्रा आणि धर्मप्रसार.
अशोकाचा बौद्धधर्माचा स्वीकार
अशोकाच्या वेळी बौद्ध धर्म त्याच्या शुद्ध स्वरूपात होता आणि निरनिराळ्या धर्मप्रचारकांकडून तो उपदेशिला जात होता. मगधराज्यात असा कोणताही प्रदेश नव्हता जेथे बौद्ध भिक्षूंचा व धर्मप्रचारकांचा प्रवेश झाला नव्हता. त्यामुळे कलिंगयुध्दाच्या आधी अशोकाची बौद्ध धर्माशी ओळखच झाली नव्हती असं आपण म्हणू शकत नाही. पुढे कलिंगयुद्धावेळी विजयानंतर झालेल्या प्राणहानीमुळे अनुतप्त झालेल्या अंतःकरणाला शांती देण्यासाठी भूतदयाप्रधान बौद्ध धर्मासारखा धर्मच अत्यंत योग्य असल्यामुळे अशोकाच्या मनावर या धर्माची छाप पडली आणि त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
बौद्ध धर्माचा स्वीकार करणं म्हणजे आता कधीच शस्त्र धरायचं नाही असं नक्कीच नव्हतं. शेवटी अशोक एक राजा होता. आपल्या राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवणं हे बौद्ध धर्म स्वीकारण्याऐवढंच महत्वाचं होतं हे त्याला नक्कीच माहीत असेल.
All that we know about his life indicates that once he had begun to devote himself to the love, protection and teaching of the law of Piety, or dharma, he never again allowed himself to be tempted by ambition into an unprovoked war.
(Page 26 Asoka The Buddhist Emperor Of India - Vincent Arthur Smith.)
म्हणजेच, त्याच्या आयुष्याबद्दल आपल्याला जे काही माहित आहे ते हे दर्शविते की जेव्हा त्याने प्रेम, संरक्षण, धर्म आणि धर्मातील शिकवणीस स्वत: ला समर्पित केले, तेव्हा त्याने स्वतःस कधीही बिनआगळिकीच्या युद्धाची महत्वाकांक्षा बाळगण्याची परवानगी दिली नाही. पुरावे नसले तरी आपण असे म्हणू शकतो की कलिंगयुद्ध हे त्याच्या आयुष्यातील पाहिलं युद्ध नाही तर शेवटचं युद्ध होतं.
वर म्हटल्याप्रमाणे कलिंगयुद्धापूर्वी सुद्धा अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. ते साल इ.स. पूर्व २६५ होतं म्हणजे युद्धापूर्वी साधारण अडीच वर्ष आधी. परंतु त्या वेळची बौद्ध धर्मविषयीची अशोकाची आस्था विशेष नसावी. कलिंग युद्धाने त्याचे मन वळविले.
बौद्ध ग्रंथ आणि दंतकथा बघितल्या तर 'उपगुप्त' नावाचा आचार्य आणि 'श्रमण निग्रोध' नावाच्या अधिकाऱ्याच्या मदतीने अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यासंबंधी ३ मोठे निर्णय घेतले.
I. हिंदू धर्मातील वर्ण व्यवस्था शिथिल केली.
II. प्राणी जीवनाच्या पावित्र्याचा आदर केला.
III. पालक, वडीलधाऱ्या माणसांचा आदर करण्याच्या श्रद्धेला फार मोठे स्थान दिले.
धर्मयात्रा
स्तंभ आणि शिलालेखांतून दिसून येतं की अशोकाने त्याची धर्म यात्रा इ.स. पूर्व २४९ मध्ये म्हणजे राज्याभिषेकानंतर २१व्या वर्षी आणि कलिंग युद्धानंतर साधारण १२ वर्षांनी सुरू केली.
I. सर्वप्रथम त्याने नेपाळ मधील तराई प्रांतातील बौद्ध जन्मस्थानाचे दर्शन घेतले.
II. नेपाळ तराई येथीलच कपिलवस्तू(तिलौरा कोट) यालाही भेट दिली. बुद्धाचे बालपण ज्या स्थानी गेले ते स्थान.
III. बोधी वृक्ष असलेले गया.
IV. ऋषीपट्टण/सारनाथ.
V. श्रावस्ती (गौतम बुद्ध ज्या ठिकाणी दीर्घ काळ राहिला ते स्थान. आजचे महेतनगर) हे सध्या अवध प्रांतातील राप्ती नदीच्या काठी असलेले सहात-महात असावे असं व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो. (पान - 41)
VI. बुद्धाचे निर्वाणस्थळ कुशीनगर.
धर्मप्रसार
अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसाराचे काम फार नेटाने केले. त्याने अगदी जंगली लोकांपासून मगध राज्यातील दूरदूरच्या प्रांतात आणि त्याच बरोबर आशिया, युरोप व उत्तर आफ्रिका वगैरे खंडात धर्म प्रसार केला.
भारताबाहेरील धर्मप्रसार
I. सीरियाच्या बादशाहकडे आणि पश्चिम आशियात.
II. टॉलेमी फिलाडेफस, इजिप्तच्या शाहच्या प्रदेशात.
III. उत्तर आफ्रिकेतील राजा मॅगस याच्या प्रदेशात.
IV. मेसिडोनियात.
भारतातील धर्मप्रसार
देश (भाग) - धर्मप्रचारकाचे नाव
I. काश्मीर - मज्झन्तिक
II. गांधार (झेलमच्या पश्चिमेला सिंधुपर्यंतचा भाग) - मज्झन्तिक
III. महिश मंडल (म्हैसूर) - महादेव
IV. वनवासी(उत्तर कानडा) - रक्षित
V. अपरांतक(उत्तर कोंकण) - योन धर्मरक्षित
VI. महाराष्ट्र - महा धर्मरक्षित
VII. योन(सरहद्द प्रांत) - महारक्षित
VIII. हिमवंत(हिमालय) - कश्यप, सहदेव
IX. सुवर्णभूमी(पेगु आणि मूलमेन)- सोन आणि उत्तर
X. सिंहलद्वीप (लंका) - महेंद्र (मुलगा)
अशोकाचा हा बौद्ध धर्मप्रसार अतिशय यशस्वी झाला होता हे व्हिन्सेंट स्मिथ, जनरल कनींगहॅम सारखे पाश्चात्य इतिहास संशोधकही मान्य करतात.
ते म्हणतात की सम्राट अशोकामुळेच बौद्ध धर्माचा विस्तार प्रत्यक्षित आणि अप्रत्यक्षितरीत्या भारत, सिलोन प्रमाणेच बर्मा, कंबोडिया, चायना, कोरिया, जपान, मंगोलिया, तिबेट सारख्या देशांत झाला.
***************
5】अशोकाचा परिवार
• पत्नी
ग्रंथ आणि शिलालेख तपासले तर अशोकास कमीतकमी ५ पत्नी होत्या हे कळते.
१. महादेवी/देवी
महावंसो, महाबोधिवंसो, दिपवंसो हे तिनही बौद्ध ग्रंथ अशोकाच्या या पत्नीचं नाव सांगतात.
२.कारूवकी
या पत्नीचा लेखच मिळाला असल्यामुळे ही पत्नी होती यात काही शंका नाही.
३. असंधिमित्रा - महावंशो मध्ये उल्लेख.
४. तिष्यरक्षिता - महावंशो मध्ये उल्लेख.
५. पद्मावती - दिव्यावदानात उल्लेख.
• मुले
१. तिवर - कारुवकीपासून. लेखात उल्लेख.
२.महेंद्र - महादेवी पासून. दिपवंसो मध्ये उल्लेख.
३.कुणाल - पद्मावती पासून. दिव्यावदान मध्ये उल्लेख.
४. जलौक - राजतरंगिणी मध्ये उल्लेख.
• मुली
१.संघमित्रा -महावंसो, दिपवंसो मध्ये उल्लेख.
२.चारुमती.
***************
6】अशोकाचे लेख
अशोकाने कलिंग युद्धानंतर प्रजेच्या हितासाठी भौतिक उन्नती बरोबरच नैतिक उन्नतीसाठी त्याने नीतितत्वे प्रजेला सांगितली. धर्माचरणाची शिकवण दिली. त्यासाठी शिलालेखांची योजना केली. त्याने शिलालेखात स्वतःची स्तुती केलेली नसून प्रजेसाठी ज्या सुधारणा केल्या, धर्माज्ञा केल्या ते सर्व कोरून ठेवले आहे.
अशोकाच्या लेखांचे साधारण खालील वर्ग पडतात.
१. स्तंभलेख, लघुस्तंभलेख
२. गिरिलेख, लघु गिरिलेख
३. कलिंगलेख
(याखेरीज भाब्रूलेख, गुहालेख, स्मारकलेख असे प्रकार आढळतात.)
हे सगळे मिळून अशोकाचे एकूण १६२ शिलालेख सापडले आहेत.
यातील बहुतांश लेखांची भाषा मागधी/पाली असून अलंकार विरहित सोपी आहे. बहुतेक सर्व लेख ब्राह्मी लिपीत कोरले गेले आहेत. लिपीबाबतीत अशोकाच्या एका लेखात धम्मलिपी असा शब्द वापरलेला दिसतो.
स्तंभलेख, लघुस्तंभलेख
अशोकाचे स्तंभलेख दिल्ली, तोपरा, मीरत, प्रयागराज, लौरीया अराराज, लौरीया नंदनगड, राम पुरा, तरई नेपाळ(२ लेख), निग्लीव, सारनाथ, कौशांबी, सांची इत्यादी ठिकाणी आहेत. एकूण मिळालेल्या स्तंभलेखांची संख्या ७ आणि ४(लघु स्तंभलेख) मिळून ११ आहेत. हुएन त्सांग नावाच्या ६व्या शतकातील चिनी प्रवाशाने अशोकाचे १६ स्तंभलेख असल्याचा उल्लेख केला आहे. या सोळापैकी वर उल्लेख केल्याप्रमाणे ११ लेखांचा शोध लागला आहे. त्यातील २ स्तंभच चांगल्या स्थितीत आहेत.
अशोकाच्या परिवारापैकी आजपर्यंत त्याच्या फक्त एका राणी(कारुवाकी) आणि एका मुलाचा(तिवर) उल्लेख प्रयागराज येथील स्तंभावर आढळतो. त्यात उल्लेख आहे की,
"दुसरी राणी व तिवराची माता कारुवकी हिच्या प्रित्यर्थ करण्यात आले आहे.."
अशोकाचे हे स्तंभलेख एकंदर प्रजेला उद्देशून आहेत. त्यात राज्यशासनाची तत्वे, धर्माचरण, आत्मपरीक्षण, हिंसेसंबंधांचे नियम, धर्मानुराग, धर्मप्रचारार्थ योजना इत्यादी भिन्न भिन्न विषय आले आहेत.
स्तंभांचे वैशिष्ट्य -
I. प्रत्येक स्तंभावरील लेखांची सुरवात "देवानां प्रिय प्रियदर्शी राजा" अशीच होते. इथे कुठेही अशोकाचे नाव येत नाही. त्यामुळे एका लेखावर अशोकाचे नाव सापडेपर्यंत संशोधकांना वाटत होते की हे लेख 'पियदस्सी'(प्रियदर्शी) नावाच्या कोणा राजाचे आहेत.
( टीप -अशोक हे त्याचे नाव फक्त त्याच्या एका लेखातच दिसून येते. या एका लेखावरून त्याने नाव अशोक होते असं आज म्हटले जाते. परंतु या बद्दल अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. )
II. अशोकाने किती स्तंभ उभारले हे आज समजत नाही परंतु जेवढे मिळालेले स्तंभ आहेत ते एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर आहेत.
III. स्तंभांची उंची १० ते १२ मीटर आहे. प्रत्येक स्तंभाचे वजन साधारण ३० टन पासून ५० टन पर्यंत आढळते. स्तंभांचा आकार गोलाकार आहे. हा आकार खालून वर निमुळता होत गेलेला आहे.
IV. सगळ्या स्तंभांसाठी वापरलेला दगड एकाच प्रकारचा आहे. हा दगड उत्तरप्रदेशातील मिर्झापुर जिल्ह्यातील चुनार येथील डोंगरात आढळतो. या भागात अनेक स्तंभ सापडले आहेत यावरून स्तंभ बनविण्याचा कारखाना इकडेच कुठेतरी असू शकतो असा आपण तर्क लावू शकतो.
V. स्तंभांची निर्मिती पूर्णपणे भारतीय कलाकारांनी केलेली आहे.
गिरीलेख, लघु गिरिलेख
गिरिलेख म्हणजे आदेश. पर्वतांवर कोरून ठेवलेले लहानमोठे शिलालेख.
आजपर्यंत अशोकाच्या गिरिलेखांपैकी १४ लेखांचा शोध लागला आहे. या १४ पैकी बहुतेक लेख अशोकाच्या कारकिर्दीच्या १३व्या आणि १४व्या वर्षातील आहेत. हे सापडलेले सर्व गिरिलेख मगध पासून खूप दूर आहेत. या गिरिलेखांतून अशोकाचा धर्म व त्याची राज्यपद्धती यांच्या संबंधीची बरीच माहिती मिळते.
प्रथम गिरिलेखाचा शोध शहाबाजगढी येथे लागला. हे ठिकाण आजच्या पाकिस्तानच्या पेशावर प्रांताच्या पुढे युसफझाई येथे आहे.
इतर गिरिलेख गिरनार, कालसी, मानसेरा इत्यादी ठिकाणी मिळाले आहेत.
लघु गिरिलेख
अशोकाचे लघु गिरिलेख रुपनाथ, मस्की, ब्रह्मगिरी(२) इत्यादी ठिकाणी आहेत. इकडे मस्की येथील लघु गिरिलेखाचा उल्लेख करावासा वाटतो कारण वर म्हटल्याप्रमाणे संशोधकांना अशोक हे नाव ज्या पहिल्या आणि एकुलत्या एक लेखात सापडले आहे तो लेख म्हणजे हा मस्कीचा लघु गिरीलेख.
याची सुरवात "देवानां पियस असोकस..." अशी होते. यावरून सम्राटाचे नाव पियदस्सी नसून असोक(अशोक) आहे हे संशोधकांना कळले.
कलिंगलेख
कलिंग म्हणजे सध्याचा ओडिसा प्रांत. आधी म्हटल्या प्रमाणे अशोकाने कलिंगयुद्धानंतर तेथे दोन लेख निर्मिले.
पहिला कलिंगलेख कलिंग मधील तोसली जवळील जौगड या ठिकाणी सापडला. या लेखाला 'प्रांतीय अधिकाऱ्यांसाठी लेख' असे आपण म्हणू शकतो कारण यात नागरिकांना न्यायाने वागवावे, त्यांच्यावर जोरजुलूम करू नये याबाबत बजावले आहे.
दुसरा लेख हा तोसली जवळील धौली येथे सापडला. हा लेख सुद्धा अधिकाऱ्यांनाच उद्देशून आहे पण या लेखास 'सीमांत लेख' असे आपण म्हणू शकतो कारण या लेखात सरहद्दीवरील लोकांशी अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे वर्तन ठेवावे हे सांगितले आहे.
***************
7】अशोक - एक विचार
अशोकावदानात, अशोक जेव्हा मृत्यूशैय्येवर होता तेव्हा त्याच्या तोंडी काही वाक्ये घातली आहेत.
या दानाने(त्याने आयुष्यात केलेल्या दानाने) मी न इंद्राच्या महालाची न ब्रह्मलोकाची कामना करतो. वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या धारेसारखे अशाश्वत आहे हे राज्य. या दानाचे असे भक्तिमहित उत्कृष्ट चित्त ऐश्वर्यरूपी फळ मला मिळावे, जे कुठे विकत मिळत नाही.
या प्रार्थनेतून रचनाकाराला हे दाखवून द्यायचं आहे की थोर राजाशिवाय इतर कोणीही इतकी महान आणि उदात्त प्रार्थना उच्चारू शकत नाही आणि यामुळेच सम्राट अशोक महान आहे.
यामागची थोडक्यात कथा अशी की अशोकाने आयुष्यात अब्जो रुपये दान करायची प्रतिज्ञा घेतली होती. परंतु मृत्यूसमयी त्याच्याकडे राज्य सोडून काहीच उरलेलं नसल्यामुळे त्याने राज्यच दान केलं.
हा प्रसंग नक्कीच ऐतिहासिक नसून काल्पनिक असला तरी यातून बोध असा की एखादी व्यक्ती कितीही क्रूर असली तरी योग्य शिकवणीने दयाळु आणि थोर बनू शकते. अशोकाने हृदयात मैत्री व करुणेची भावना बाळगून असहाय्य माणसांना सुरक्षिततेचे आश्वासन दिले, आजारी लोकांबद्दल सहानुभूती बाळगली, गोर- गरिबांना दान दिले, आसरा दिला आणि म्हणूनच तो देवांचा प्रिय प्रियादर्शी ठरला.
संदर्भ -
- महावंसो
- दिपवंसो
- विष्णुपुराण
- अशोकावदान
- Asoka The Buddhist Emperor Of India - Vincent Arthur Smith.
- सम्राट अशोकचरित्र - वासुदेव गोविंद आपटे, प्र. रा.अहिरराव.
- Beal's Record of Western World.
- महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार - शिलालेख आणि ताम्रपट - प्रा. कल्पना रायरीकर, डॉ. मंजिरी भालेराव.
- Literary History of Sanskrit Buddhism - G.K. Nariman.
- The legend of emperor Ashoka in Indian and Chinese texts - Dilip kumar Biswas.
© ओंकार ताम्हनकर.






Comments
Post a Comment